अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहर पोलिस ठाण्याजवळील वीर सावरकर चौकातील नंदन डेअरी समोरील रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी आपल्या पथकासह काल दि 4 ऑगस्ट रोजी दुपारी कारवाई केली. रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने हा परिसर मोकळा करण्यात आला. मात्र, या कारवाईनंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून आली असून, अशीच कारवाई रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवरही होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरातील अनेक व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये पुरेशा पार्किंगची सुविधा नसल्याने दुकानदार व ग्राहक रस्त्यावरच वाहने लावतात. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहन चालकांना मोठी अडचण निर्माण होते. वाहतूक कोंडी तर नेहमीचीच बाब झाली आहे. अशा स्थितीत फक्त छोट्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाते आणि परिसरातील मोठ्या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष का? असा सवालही नागरिक विचारत आहेत.
वाहतूक शाखेने संपूर्ण शहरात समान न्यायाने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भाजी विक्रेते रस्त्यावर बसल्यामुळे अडथळा होत असेल, तर बेशिस्त वाहनांमुळे निर्माण होणारा अडथळा दुर्लक्षित कसा केला जातो, हे समजण्यासारखे नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
