अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर कोणतेही यश शक्य – स.पो.नि. मुटेकर
चाळीसगाव (प्रतिनिधी) – “विद्यार्थ्यांनी कठीण मेहनत, नम्रता आणि गुरुजनांप्रती आदर ठेवून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे,” असे मार्गदर्शन चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शंकर मुटेकर यांनी केले.
दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी चाळीसगाव येथील बी.पी. आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय प्रशासनाने केले होते.
या वेळी बोलताना स.पो.नि. मुटेकर यांनी मा. विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन PPT च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
त्यांनी यशासाठी आवश्यक असलेल्या चार गुणांचा – जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यास – विशेषतः उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल आणि डिजिटल साधनांचा सकारात्मक उपयोग अभ्यासासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उच्च पदावर पोहोचलेल्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा विद्यार्थ्यांपुढे ठेवत त्यांनी प्रेरणा दिली.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दिकर, उपप्राचार्य प्रा. अजय काटे, प्रा. नितीन ननवरे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
