अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील भटके व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत शहर काँग्रेस जनतेचा आवाज बनली आहे. नागरिक, विद्यार्थी, सायकलस्वार तसेच दुचाकीस्वारांना दररोज या जनावरांमुळे भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत असून कधीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती शहर काँग्रेसने निवेदन देत व्यक्त केली आहे.
नगरपालिकेने याआधी एका एजन्सीद्वारे ही मोहीम राबविली होती. परंतु ती फक्त दिखाऊ व प्रसिद्धीसाठी होती असेच वाटते, कारण आजही शहरातील मुख्य रस्ते तसेच गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भटके व मोकाट जनावरे फिरताना दिसत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत निवेदन देत केला आहे. तसेच नेमलेली एजन्सी प्रत्यक्षात काम करते आहे की फक्त बिले सादर करून लाभ घेत आहे, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शहर काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, “मोकाट जनावरांमुळे जर काही अप्रिय घटना घडली तर त्यास प्रशासक म्हणून नगरपरिषद जबाबदार राहील.” पुढेही जर शहरात जनावरे फिरताना दिसली, तर काँग्रेस लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास भाग पडेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रविंद्र जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रदीप देशमुख, देवेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष मंगेश अग्रवाल, पंकज शिरोडे, अमजद खान यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
