अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
गौताळा औट्रम घाट अभयारण्यात चंदन तस्करीचा कहर – अधिकाऱ्यांच्या संगनमताचा गंभीर आरोप
चाळीसगाव(प्रतिनिधी)- गौताळा औट्रम घाट अभयारण्य (पाटणादेवी विभाग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) परिसरात चंदन तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, संबंधित क्षेत्रीय वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच ही तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणादेवी परिसरात दहा-पंधरा जणांचे तस्कर टोळके सलग ३ ते ४ दिवस मुक्काम करून अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने जिवंत चंदन वृक्षांची कत्तल करून तस्करी करीत आहेत. लोणजे, सांगवी ते राजदेहरे या संपूर्ण पट्ट्यात चंदन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्याची माहिती समोर आली आहे.
या तस्करीमुळे मौल्यवान वनस्पती व अभयारण्यातील जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला असून, बिबट्या, वाघ, रानडुक्कर यांसारखे प्राणी जंगल सोडून लोकवस्तीत शिरत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. याचबरोबर स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांच्या पारंपरिक हक्कांवरही गदा आली आहे.
सदर प्रकरणावर दाखल तक्रारींमध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :
पाटणादेवी परिसरात तात्काळ विशेष तपासणी करून इतर विभागातील सक्षम व प्रामाणिक अधिकारी नेमावेत.
चंदन तस्करांसोबत त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, भारतीय वन अधिनियम 1927, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम 1964 तसेच भारतीय दंड संहिता कलम 379, 120(B), 409 नुसार कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबन व विभागीय चौकशी तातडीने राबवावी.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (CEC) व राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांच्या देखरेखीखाली करण्यात यावी.
तसेच परिसरातील पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी या गंभीर प्रश्नावर शासन व वन विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
