अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलिसांनी मच्छीबाजार, तांबापुरा येथील एका घरातून तब्बल १५ किलो ५२५ ग्रॅम वजनाचा, किंमत ९३,१५० रुपये इतका अवैध गांजा जप्त करून एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांना गुप्त बातमी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सपोनि. अनिल वाघ, पोउपनि. राहुल तायडे, पोउपनि. चंद्रकांत धनके, पोहेकॉ. किरण चौधरी, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी, पो.काँ. गणेश ठाकरे, पोकॉ. किरण पाटील, पोकॉ. नितीन ठाकुर, पोकॉ. राहुल घेटे व पोकॉ. योगेश घुगे अशा पथकाची नेमणूक करून सापळा रचला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी मच्छीबाजार येथील घराबाहेर आवाज दिला असता मेहमुद शेख मेहबुब (वय ५९, व्यवसाय मजुरी, रा. मच्छीबाजार तांबापुरा, जळगाव) हा बाहेर आला. त्याच्याकडून विचारपूस केल्यानंतर घराची तपासणी करण्यात आली असता दोन गोण्यांमध्ये १५ किलो ५२५ ग्रॅम गांजा आढळून आला. पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(II)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस २ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. राहुल तायडे व पोकॉ. चेतन पाटील करीत आहेत.
संपूर्ण कारवाई ही पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध अंमली पदार्थ विक्रीबाबत त्वरित पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
