अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेकांच्या घरात तसेच दुकानात पाणी शिरल्याने वस्तूंचे नुकसान झाले असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीशी लढा देण्यासाठी स्थानिक नागरिकांसह नगरपालिका प्रशासन कार्यरत असले तरी आनंदवाडी परिसरातील अंडरग्राउंड गटार हे नागरिकांसाठी नव्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे.
अंडरग्राउंड गटारचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. मात्र या गटारीच्या चेंबरमधून पावसाचे व दूषित पाणी ओसंडून थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात चिखल साचून अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून रोगराई पसरण्याचा मोठा धोका वाढला आहे. परिसरातील लहान बालकांना कोणतेही संसर्गजन्य आजार झाले, तर याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नगरपालिका प्रशासनाने पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अंडरग्राउंड गटारच्या चेंबरमधून ओसंडणारे पाणी हे त्यांच्या प्रयत्नांना हरताळ फासत आहे. “आजच जर अशी परिस्थिती उद्भवत असेल, तर भविष्यात शहरातील सर्व सांडपाणी वाहून नेण्यासाठी या गटारी यशस्वी ठरतील का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, या गटार योजनेचा उद्देश नागरिकांना दिलासा देण्याचा असला तरी प्रत्यक्षात मात्र याचा फटका सामान्य नागरिकांनाच बसत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे की, अंडरग्राउंड गटारच्या चेंबरमधील गळती त्वरित थांबवावी, परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. अन्यथा मोठ्या आरोग्यसंकटाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
