अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
नशिराबाद (प्रतिनिधी) – दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा सह अटक करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले असून, ही कारवाई मंगळवारी (दि. 23 मार्च 2026) सायंकाळी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान करण्यात आली.
पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेदरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते. याच दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 288/2025 (भा.न्या.सं. कलम 311, 312 तसेच शस्त्र अधिनियम 3/25) मधील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील हा नशिराबाद येथील बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे व परिसरात दहशत निर्माण करत आहे.
माहितीच्या आधारे नारखेडे यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून रात्री सुमारे 8.20 वाजता आरोपीला अचानक छापा टाकून ताब्यात घेतले. आरोपीच्या झडतीत एक लोखंडी, चंदेरी रंगाचा व काळ्या प्लास्टिक मुठीचा गावठी कट्टा तसेच एक डमी कट्टा जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेला आरोपी चेतन सूर्यभान पाटील (वय 18, रा. वरची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 93/2026 नुसार शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ विभाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व त्यांच्या पथकातील राजेश मेंढे, कमलाकर बागुल, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, भुषण पाटील व विजय अहिरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
