अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)-तालुक्यात कोणतेही अधिकृत वाळू ठेके नसतानाही गिरणा नदीपात्रासह जामदा, रहिपुरी, उपखेड, पिलखोड आदी ठिकाणी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचा आरोप रयत सेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाळू माफियांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दि. ६ एप्रिल २०२६ रोजी रयत सेनेच्या वतीने नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दसेगाव फाट्याजवळ भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थिनीला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
रयत सेनेने आरोप केला आहे की महसूल, पोलीस व आरटीओ प्रशासन या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. वाळूची मोठ्या प्रमाणावर होत असलेली चोरी भविष्यात गिरणा नदीपात्रातील वाळू संपवून पाणीटंचाई निर्माण करू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे वाळू माफियांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच धुळे रोड बायपास उड्डाणपूल, हॉटेल विराम चौक, महाराणा प्रताप चौक, खरजई नाका, रेल्वे गेट, हॉटेल दयानंद परिसर, कन्नड बायपास व घाट परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियंत्रण पोलीस व प्रशासनाकडे द्यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, प्रशासनाने बंदोबस्त न केल्यास सामाजिक संघटना, कार्यकर्ते व स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने गस्त घालतील असा इशाराही देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाचा इशारा रयत सेनेने दिला आहे.
या निवेदनावर रयत सेनेचे प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, शहराध्यक्ष शिवाजी गवळी, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हीरेकर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, समाधान सोनवणे, वरून वाणी, रमेश सोनार, वसंत बाविस्कर, भूषण पाटील, जितेंद्र भोसले, सुधीर पाटील, शकील खान यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
