अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक ४ जुलै रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास ठाकूर वाडी येथील पुष्पाबाई पितांबर ठाकूर (वय अंदाजे ७० वर्षे) या वृद्ध महिलेचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हिरापूर रोड वरील तालुका कृषी कार्यालयाजवळील वळणावर हा अपघात घडला असून सदर ठिकाणी वारंवार मागणी करूनही अद्याप गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात आले नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे,यामुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी दिनांक ५ जुलै रोजी सकाळी रस्त्यावर उतरत तीव्र रस्ता रोको आंदोलन केले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलक नागरिकांशी संवाद साधत, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान,आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलक नागरिकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत, “आजच तुम्ही सांगाल त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात येतील,” असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
हा या रोडवरील तिसरा जीवघेणारा अपघात असून एका महिन्यात तीन लोकांचा या रस्त्यावर मृत्यू झाला आहे.
