अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
फत्तेपुर (प्रतिनिधी) – कसबापिंप्री ते पिंपळगाव चौखांबे रस्त्यावर २२ जून २०२५ रोजी सकाळी सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. फत्तेपुर पोलीस ठाण्यास घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी हा प्रकार घातपाताचा वाटल्याने तपासाला गती देत आरोपींना अवघ्या 8 तासात केली अटक.
सुरुवातीस मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील नागरिकांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीत मृत व्यक्तीचा कसबा पिंप्री येथील रहिवासी शुभम धनराज सुरळकर असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध फत्तेपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व फत्तेपुर पोलीस ठाण्याचे पथकाने सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मृतकाच्या घरात तपासणी करत असताना संशयास्पद चटई खाली रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे संशय वाढत गेला आणि मृतकाचे वडील धनराज सुरळकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खळबळजनक माहिती दिली.
धनराज सुरळकर याने पोलीसांकडे कबुली दिली की, मृतक शुभम याला दारूचे व्यसन होते. तो सतत घरात दंगल करीत होता व कुटुंबियांना त्रास देत होता. याच कारणामुळे त्याची पत्नीही त्याला सोडून माहेरी गेली होती. या त्रासाला कंटाळूनच धनराज याने शुभमचा खून केला. रात्री सर्व झोपल्यानंतर दगडाने डोक्यात प्रहार करून शुभमचा खून केला. नंतर मृतदेह घरातून हलवण्यासाठी त्याने आपल्या दुसऱ्या मुलाला गौरव सुरळकर व भावाला हिरालाल सुरळकर यांची मदत घेतली. तिघांनी मिळून मृतदेह चारचाकी गाडीत टाकून रस्त्यावर नेऊन टाकला.
तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील, फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोना हेमंत पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ राहुल महाजन, पोकॉ भुषण पाटील, पोकॉ भरत पाटील, दर्शन ढाकणे तसेच फत्तेपुर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी केली असुन पुढील तपास फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. अंकुश जाधव हे करीत आहेत.
