अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
बर्मिंगहॅम – एजबॅस्टनच्या ऐतिहासिक मैदानावर अखेर भारताने आपल्या कसोटी विजयानं नवा इतिहास रचला आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी त्यांच्या निर्णयाला पुरेपूर उत्तर दिलं.
भारताकडून शुभमन गिलने भक्कम द्विशतक झळकावत आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली. त्यासोबत यशस्वी जैस्वाल व रवींद्र जडेजानेही अर्धशतकी योगदान देत भारताच्या पहिल्या डावात भक्कम ५८७ धावा फलकावर लावल्या.
गोलंदाजीतही भारताने कमाल केली. मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या धडाकेबाज गोलंदाजीनं इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर गुंडाळला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने शतक साजरं केलं, तर जेमी स्मिथने नाबाद १८४ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.
पहिल्या डावात १८० धावांची आघाडी घेतल्यानंतर, भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४२७ धावा करत डाव घोषित केला. या डावात शुभमन गिलने पुन्हा एक शतक झळकावलं, तर केएल राहुल, रिषभ पंत आणि जडेजाने अर्धशतकांची नोंद केली.
इंग्लंडपुढे ६०८ धावांचं विशाल आव्हान होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ते टिकाव धरू शकले नाहीत आणि अखेर भारताने एजबॅस्टनवर पहिला ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला.
गौरवाची गोष्ट म्हणजे, १९६७ ते २०२२ या कालावधीत भारताने एजबॅस्टनमध्ये खेळलेल्या ८ कसोटींपैकी एकही सामना जिंकला नव्हता. १९८६ चा सामना अनिर्णित राहिला होता, उर्वरित सात सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
या पार्श्वभूमीवर शुभमन गिलच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर भारतीय संघाच्या आत्मविश्वासासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. शुभमनसाठीही हा विजय खास ठरला, कारण कर्णधार म्हणून त्यांच्या नेतृत्वात मिळालेला हा पहिलाच कसोटी विजय आहे
