अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील नगरपालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांची नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांनी काल दिनांक ५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी शाळांमधील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली.
शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालये, वीज व्यवस्था तसेच अध्यापनाची गुणवत्ता याबाबत नगराध्यक्षा यांनी निरीक्षण केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण म्हणाल्या की, “शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे. चाळीसगाव शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे. भविष्यातही शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील.”
या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, भाजपा गटनेते प्रशांत कुमावत, शिक्षण सभापती करण पाटील, नगरसेवक श्री. धर्मा बच्छे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
