अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी)–विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (ता. ३० जून) सुरू होत आहे. या अधिवेशनात चाळीसगाव मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगाव येथे एमआयडीसी असली तरीही त्यामध्ये नवीन, मोठ्या उद्योगांची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय अधिवेशनात प्राधान्याने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे यासाठी रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये गिरणा-मण्याड नदीजोड प्रकल्प, माणिकपुंज पाटचारी योजना, हातगाव प्रकल्प, ‘सुप्रमा’ यांसारख्या महत्वाच्या सिंचन योजनांचा समावेश आहे.
याशिवाय चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयांसाठी बिलाखेड शिवारात जागा उपलब्ध करून देणे आणि कार्यालयांना मंजुरी मिळवणे, बहाळ येथील ऋषीपंथाजवळ नवीन पूल उभारणे, तसेच चाळीसगाव येथे मध्यवर्ती बसस्थानकाची उभारणी आणि नवीन बसेस उपलब्ध करून देणे हे विषयही अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, “चाळीसगावच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून या अधिवेशनातही विविध कामांच्या मंजुरीसाठी आवाज उठवणार आहे.”
