अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
भुसावळ(प्रतिनिधी)- दि 30 जून संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास भुसावळ आणि जळगावच्या सीमेवरील नदीकाठच्या दाट जंगलात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर अंकुश आणण्यासाठी तहसीलदार नीता लबडे यांनी स्वतः पुढाकार घेत धाडसी कारवाई केली.त्यांनी आपल्या पथकासह तब्बल २ किलोमीटर जंगलात पायी चालत जाऊन छापा टाकत ७ डंपर आणि १ जेसीबी जप्त केली.
दाट जंगल, उंचसखल भाग, पडीत शिवार… अडचणींची तमा न बाळगता अधिकारी सरसावले!
या कारवाईदरम्यान अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनधारकांनी मुरूम रस्त्यावर फेकून वाहने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस आणि नगरपरिषदेच्या तत्पर मदतीने या वाहनांवर त्वरित कारवाई करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
ही कारवाई केवळ अवैध उत्खननाविरोधात नाही, तर कायद्याचा धाक निर्माण करणारी ठरली आहे.तहसीलदार नीता लबडे यांचे धाडस आणि कर्तव्यनिष्ठा अनुकरणीय ठरली असून, त्यांनी दाखवलेली कठोर भूमिका आणि कार्यपद्धती प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
या कारवाईतून अवैध उत्खनन करणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा — कायद्यापासून कुणीच सुटणार नाही!
