अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव नगरपालिकेने प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरावर बंदी घालून विविध ठिकाणी कारवाया केल्या असल्या तरी शहरात प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर सर्रास सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही.
शहरातील बाजारपेठा, भाजी मंडई, किराणा दुकाने तसेच इतर व्यवसायिक ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणावर ५० मायक्रॉनच्या खालील प्लास्टिक बॅगचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने संयुक्त पथकाद्वारे कारवाई करत दंड वसूल केला होता. मात्र ही कारवाई काही दिवसापुरती मर्यादित राहिली असून, त्यानंतर पुन्हा प्लास्टिक बॅगचा वापर जोमात सुरू झाला आहे.
पर्यावरण रक्षणासाठी व प्लास्टिकमुक्त शहराच्या उद्देशाने हे अभियान राबवले जात असले तरी नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये त्याबाबत जागरूकतेचा अभाव दिसून येतो. स्थानिक नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, केवळ कारवाई न करता सातत्यपूर्ण जनजागृती व कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
कॅरीबॅग देणाऱ्यांवर कारवाई,विकणाऱ्यांचे व्यापाऱ्यांचे काय?
नगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या कॅरीबॅग विरोधी पथकाने केवळ किरकोळ व्यापाऱ्यांवर म्हणजे जे भाजीपाला,किराणा,फळ इत्यादी माल देण्यासाठी कॅरीबॅग देत असतात त्यांच्यावर कारवाई झाली मात्र प्लॅस्टिक कॅरी बॅग विकणारे मोठे व्यापारी या कारवाईपासून सुरक्षित आहे? जर नगरपालिका प्रशासनाला खरंच प्लॅस्टिक कॅरी बॅग मुक्त शहर करायचे असेल तर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असा सूर नागरिकांमधून निघत आहे.
