अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील विविध भागांमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते आणि गटारींचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले.पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी रस्ते व गटारींच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पावसामुळे गोपाळपुरा प्रभाग क्रमांक 5 भागातील गटारी अरुंद झाल्याने गटारींमधुन पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नाही. परिणामी, नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत नागरिकांच्या घरात घुसत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नगरपालिका प्रशासनाने पाईपलाइनचे काम करताना खोदकाम करतांना गटारी देखील खोदल्या गेल्या होत्या पण गटारी पूर्ववत न केल्याने त्या अरुंद झाल्याने पावसाळ्याचे पाणी लोकांच्या घरात शिरत आहे.या पाण्यात गटारींची घाण आणि गाळामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून, तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
