oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या सर्कलला फेरा न मारता थेट मार्गक्रमण करत एसटी बस जात असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चौकातील वाहतुकीचा मुख्य नियम धुडकावून लावत काही एसटी बस चालक सरळ मार्गाने बस नेत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी केवळ एसटी बसच नव्हे तर इतर वाहनचालकांकडूनही वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. अचानक येणाऱ्या बसांमुळे दुचाकीस्वार, रिक्षा चालक तसेच पादचाऱ्यांचे जीव धोक्यात येत असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे या चौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कार्यरत असतानाही या गंभीर बाबीकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा अभाव असल्याने वाहनचालकांचे धाडस वाढत असून, चौकात गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून, येथे कडक वाहतूक शिस्त लागू करणे गरजेचे आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन एसटी बससह सर्व वाहनांना सर्कलचा नियम पाळण्याचे आदेश द्यावेत, तसेच वाहतूक पोलिसांनी नियमित कारवाई करून अपघाताचा धोका टाळावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
