अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) :जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ ट्रकमधून सबमर्सीबल मोटारपंप व सोलर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक 31 मे 2025 रोजी एरंडोल पोलीस स्टेशन येथे सी.सी.टी.एन.एस. गु.र.न. 93/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 2 लाख 35 हजार रुपये किमतीचे सबमर्सीबल व सोलर पंप चोरीस गेले होते.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्या पथकाने सुरू केला. गुप्त बातमी व तांत्रिक माहितीच्या आधारे 25 ऑगस्ट 2025 रोजी आरोपी आकाश लालचंद मोरे (रा. मुगपाठ, पदमालय, ता. एरंडोल) यास नागदुली गावाजवळ पदमालय फाट्यावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यानुसार आकाश लालचंद मोरे (वय 23, रा. मुगपाठ, पदमालय, ता. एरंडोल),भरत बाबुराव बागुल (वय 32, रा. केवडीपुरा, एरंडोल), पृथ्वीराज रतीलाल पाटील (वय 20, रा. वरखेडी, ता. एरंडोल) सदर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात पो. उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ हरीलाल पाटील, पोहेकॉ प्रविण मांडोळे, पोकॉ राहुल कोळी व पोहेकॉ दीपक चौधरी यांचा समावेश होता.
