अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
गिरणा मोठा प्रकल्प – सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव (प्रतिनिधी) –पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा मोठा प्रकल्पामध्ये आज दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता एकूण ९५.७५ टक्के पाणीसाठा झालेला आहे. प्रकल्पाच्या द्वार परिचलन वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबरपर्यंत ९६ टक्के साठा ठेवणे आवश्यक आहे.
कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशान्वये, धरणामध्ये सध्या २५०० क्युसेक्स इतका पाण्याचा येवा होत असून आज दुपारी १.०० वाजता गिरणा धरणाची द्वारे उघडण्यात येणार आहेत. याद्वारे गिरणा नदीपात्रात ५०० ते १००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येईल. पुढील काही तासांमध्ये पाण्याची आवक वाढल्यास विसर्गाचे प्रमाण देखील वाढविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आपले पशुधन, शेतीसाठी वापरण्यात येणारे मोटार पंप, गुरेढोरे व अन्य वस्तू तात्काळ सुरक्षित स्थळी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रामध्ये सुरू असलेली विविध विभागांची बांधकामे सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना देण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
यासंदर्भात संबंधित शासकीय यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
