अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत गावठी बनावटीच्या पिस्तूलांची विक्री–खरेदी करणाऱ्या दोघा इसमांना जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अमळनेर-चोपडा रोडवरील संत आसाराम बापु आश्रमासमोर करण्यात आली. गुप्त माहिती मिळताच मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे अन्वेषण पथकाला सोबत घेत छापा टाकला. पोलिसांना पाहून दोन इसम पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना शिताफीने पकडण्यात आले.
आरोपी विशाल भैय्या सोनवणे (१८, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर),गोपाल भिमा भिल (३०, रा. सत्रासेन, ता. चोपडा) अशी आहेत.अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल (किंमत ६०,००० रुपये),सहा जिवंत काडतुसे (किंमत ६,००० रुपये),दोन मोटारसायकली (किंमत १,००,००० रुपये)
असा एकूण १,६६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शस्त्रांचा परवाना विचारल्यावर आरोपींकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळले.
या प्रकरणी पोलीस शिपाई विनोद संदानशिव यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ३५२/२०२५, शस्त्र अधिनियम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.नि. नामदेव बोरकर करीत आहेत.
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर व अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, कोणीही बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यास किंवा विक्री–खरेदी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
