अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगावात घरफोडी प्रकरणी रामानंद नगर पोलिसांची मोठी कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात 36 लाखांहून अधिक किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व इतर मुद्देमालाची घरफोडी उघडकीस आणण्यात रामानंद नगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तब्बल 34 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
प्रकरणाची माहिती
दि. 01 जून 2025 रोजी फिर्यादी लिलाधर शांताराम खंबायत (रा. न्यू पार्वतीबाई काळे नगर, मोहाडी रोड, जळगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. फिर्यादींचे साडू नरेंद्र वाघ परदेशी असल्याने त्यांच्या बंद घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण 36 लाख 83 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरट्यांना अटक
गुन्ह्याचा तपास सुरू असताना दि. 19 सप्टेंबर रोजी संशयितपणे फिरणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी पकडून चौकशी केली असता त्यांनी मोहाडी रोड येथील घरफोडीची कबुली दिली. त्यानुसार आरोपी क्रमांक 1) रवि प्रकाश चव्हाण (रा. तांबापुरा, जळगाव) व 2) शेख शकील शेख रफिक (रा. मौलीगंज, धुळे, ह.मु. सालार नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगितल्याने आरोपी क्रमांक 3) जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा (रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) व 4) गुरुदयालसिंग मनजित टाक (रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव) यांनाही अटक करण्यात आली.
मुद्देमाल हस्तगत
तपासादरम्यान आरोपींनी चोरीचा सोन्या-चांदीचा ऐवज सुरत व जामनेर येथे विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून तेथून 33 लाख 79 हजार रुपये किंमतीचे 310 ग्रॅम सोन्याचे दागिने, 25 हजार रुपये किंमतीचे 250 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 45 हजार रुपये किंमतीची MH-19-BW-9144 क्रमांकाची अॅक्टीवा दुचाकी असा एकूण 34 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांची कामगिरी
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण कोते, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, नाईक योगेश बारी, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पोशि अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटोल, दिपक वंजारी व चालक हवालदार प्रमोद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रामानंद नगर पोलिसांनी या कारवाईतून दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत मोठी कामगिरी केली आहे.
