अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
जामनेर(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये जामनेर तालुका सर्वाधिक प्रभावित झाला असून तब्बल ७२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाघूरसह अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने रस्ते, पूल पाण्याखाली गेले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला.
घरांमध्ये पाणी, मोठे नुकसान
नेरी, चिंचखेडे, सुनसगाव आदी गावांत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जनावरे वाहून गेल्याचेही उघड झाले आहे. रात्रीपासूनच जळगाव-जामनेर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेकडो वाहनचालक व प्रवासी रस्त्यावरच अडकले.
प्रशासनाची धावपळ
पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महसूल प्रशासन, तहसील विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत तातडीच्या दिलासा उपाययोजनांचे निर्देश दिले.
शाळांना सुट्टी जाहीर
आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जामनेर तालुक्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कुठे किती पाऊस?
जामनेर तालुका : ७२.३ मिमी (२४ तासांत सरासरी)
नेरी मंडळ : १५२.५ मिमी
तोंडापूर : १००.८ मिमी
शेंदुर्णी : ८३.३ मिमी
जामनेर : ७०.३ मिमी
वाकडी : ६६.३ मिमी
फत्तेपूर : ५२.८ मिमी
पहूर : पाऊस नाही
पाचोरा तालुका : ४३.५ मिमी
पिंपळगाव हरेश्वर : ११३.८ मिमी
वरखेडी : ११३.८ मिमी
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नदी-नाले काठावर जाण्याचे टाळावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
