अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कौटुंबिक वादाने त्रस्त झालेली महिला आपल्या पती व सासरच्यांविरोधात कारवाईसाठी महिला तक्रार निवारण कक्ष, जळगाव येथे गेली होती. तिथे समझोता न झाल्याने तिने भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी जळगाव येथून पत्र घेऊन आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाणे गाठले.
मात्र, या प्रकरणात पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा रवींद्र रावते, प्रवीण संगिले, अकरम बेग व पो.ना. भगवान माळी यांनी दोन्ही पक्षातील कुटुंबीयांना अत्यंत सौम्य व आदरयुक्त पद्धतीने समुपदेशन (कॉन्सलिंग) करून एकमेकांतील गैरसमज व मनोमालिन्य दूर करण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नांना यश आले आणि जिथे महिला तक्रार निवारण कक्षालाही यश आले नव्हते, ते कार्य चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कौशल्याने पूर्णत्वास नेले. पोलिसांनी केवळ कर्तव्य बजावले नाही, तर सामाजिक बांधिलकीचे भान राखून एक कुटुंब पुन्हा एकत्र केले.
परिणामी संबंधित महिला, तिचे माहेर व सासरचे सदस्य सर्वांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे मनापासून आभार मानले.एक वर्षापासून माहेरी बसलेली सदर महिला आपल्या पती व मुलासोबत आनंदात मालेगाव सासरी रवाना झाली.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचे एक सामाजिक जुळलेले भावनिक रूप समोर आले,पोलिसांच्या पुढाकाराने १ वर्षापासून रागातून दूर झालेले जोडपे तर जवळ आलेच पण त्यांच्या परिवाराचे देखील मनोमिलन पोलिसांच्या भावुक समुपदेशाने झाले आणि रागात असलेल्या दोन्ही परिवारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आनंदाश्रु पाहायला मिळाले.फक्त गुन्हे आणि गुन्हेगारी पलीकडे जात केलेले ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व सहकाऱ्यांचे कार्य हे कौतुकास्पद तर आहेच पण समाज हिताचे देखील आहे यात शंका नाही.पोलिसांच्या संवेदनशील भूमिकेमुळे वादातुन तुटणाऱ्या नात्याची संवादाकडे वाटचाल सुरू झाली.
