संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- ९ ऑगस्ट २०२४ रोजी, आर.जी. कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट- ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याचा निषेध म्हणून इंडीयन मेडिकल असोसिएशन तर्फे चाळीसगाव येथे 17 ऑगस्ट रोजी 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवत शहर पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
९ ऑगस्ट २०२४ रोजी, आर.जी. कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट- ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे अत्याचार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.
या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.
या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे.
या दरम्यान सर्व इंडियन मेडिकल अससोसिएशन चाळीसगावाचे पदाधिकारी आणि सभासद चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन समोर, स्वातंत्रविर सावरकर चौकात दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुंन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती इंडियन मेडिकल अससोसिएशन तर्फे करण्यात आली आहे तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्या बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे करणार असल्याचे देखील पत्रात म्हटले आहे.पत्रकावर इंडियन मेडिकल अससोसिएशन अध्यक्ष डॉ संजय चव्हाण व सचिव डॉ किरणकुमार मगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
