अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव शहरवासीयांना विकासाची मोलाची भेट मिळाली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत चाळीसगाव नगरपरिषदेला तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून शहरात भव्य ‘नमो उद्यान’ उभारले जाणार आहे. हा शासन निर्णय काल दि. १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबतची माहिती देताना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मोदिजींच्या वाढदिवशी ही निधी मंजुरी मिळणे म्हणजे शहरवासीयांसाठी एक अनमोल भेटच आहे. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच महायुती सरकारचे आभार मानले.
यापूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून शहरातील २५ हून अधिक खुल्या जागांवर उद्याने उभारली गेली आहेत. तसेच सर्वात मोठ्या सुवर्णा स्मृती उद्यानाचे नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता ‘नमो उद्यान’ची भर पडल्याने शहरात हरित सौंदर्य आणखी खुलणार असून नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.
‘नमो उद्यान’ची वैशिष्ट्ये :
आधुनिक, हिरवाईने नटलेले आणि सुसज्ज उद्यान
मुलांसाठी खेळाची साधने
नागरिकांसाठी व्यायाम साहित्य व वॉकिंग ट्रॅक
आराम व विश्रांतीची सोय
पर्यावरण संवर्धनाला चालना
शहर सौंदर्यीकरण व सामाजिक एकात्मता वृद्धिंगत
‘नमो उद्यान’मुळे चाळीसगावचे जीवनमान अधिक आरोग्यदायी, समृद्ध आणि आकर्षक होण्यास मदत होणार आहे.
