अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव(प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इको क्लब तर्फे पर्यावरणपूरक आणि सर्जनशीलतेला चालना देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘सर्वांसाठी अन्न’ या प.अभ्यास विषयाअंतर्गत गणपती उत्सवानंतर मिळालेल्या निर्माल्याचे (सुकलेली व वापरून टाकलेली फुले) संकलन करून त्यांचा पुनर्वापर केला.
विद्यार्थ्यांनी या फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग करून कंपोस्ट खत तयार केले. यामुळे केवळ कचरा व्यवस्थापनास हातभार लागला नाही तर रोगराईलाही आळा बसण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण व जागरूकता निर्माण करणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व पर्यावरण संवर्धनाच्या जाणिवेला चालना मिळाली.
या अभिनव कल्पनेला शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांकडून यशस्वीरीत्या अमलात आणले.
हा उपक्रम केवळ शैक्षणिकच नाही तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरला आहे.
