अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- (दि. ०४ सप्टेंबर २०२५) घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा साठा करून अवैधरित्या वाहनात भरून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ₹५,१६,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सोपान गोरे व पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ छगन तायडे, पोकॉ रतन गिते व पोकॉ मयुर निकम यांनी दोन ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली.
छाप्यात घरगुती गॅस सिलेंडरांचा साठा तसेच वाहन मिळून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात अनिल शंकर सोनवणे (वय ४८, रा. बांभोरी, ता. धरणगाव) व मोईन शेख युसुफ शेख (रा. तांबापुरा, जळगाव) या दोन आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमुळे घरगुती गॅसच्या काळ्या बाजारावर मोठा आळा बसेल अशी आशा असून नागरिकांतून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्याचे कौतुक होत आहे.
