अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर “एक राखी सुरक्षतेची, एक राखी सन्मानाची” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबाबतची सकारात्मक भावना निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थिनी आणि पोलिसांमध्ये संवाद वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
पोलिसांची संवेदनशील भूमिका; वादातुन तुटणाऱ्या नात्याची संवादाकडे वाटचाल
या उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनींनी पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील यांना राखी बांधून त्यांचा सन्मान केला. विद्यार्थिनींच्या या सन्मानाने पोलीस अधिकारी भारावून गेले आणि त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुलींनी निर्भीडपणे वागण्याचे आवाहन केले. “अडचणीच्या वेळी पालक, शिक्षक अथवा पोलिसांशी न घाबरता संवाद साधा,” असे स्पष्ट शब्दांत बडगुजर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाबाबत शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमधील सामाजिक जाणीव वाढावी आणि पोलिसांबाबत आदरभाव निर्माण व्हावा, म्हणून या प्रकारचे उपक्रम वेळोवेळी घेतले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होताना दिसत आहेत.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले तर शितल कोळी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, कविता सानप, साधना शिरसाट, सरला पाटील, सुवर्णा अंभोरे, शारदा तडवी, सुवर्णा महाजन, निलेश पवार आणि दिनेश पाटील यांचे विशेष योगदान लाभले.
