अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : संघर्ष आणि मेहनतीची कमाई नेहमीच फळ देते, याचा उत्तम प्रत्यय चाळीसगावातील प्रभात गल्लीतील रहिवासी भैय्या पाटील यांना व त्यांच्या कुटुंबाला आला आहे. भैय्या पाटील गेल्या अनेक वर्षांपासून हातगाडीवर भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले, आर्थिकदृष्ट्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांचा संसार सुरू होता. परंतु आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात यशस्वी व्हावे, ही त्यांची मनोमन इच्छा होती.
भैय्या पाटील यांचे चिरंजीव गौरव पाटील यांनी वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत आपल्या शिक्षणात प्रचंड मेहनत घेतली. कुठलेही क्लासेस न लावता केवळ सेल्फ स्टडीच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय डाक विभागाच्या परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची ब्रँच मॅनेजर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक १९ जून २०२५ रोजी निकाल जाहीर होताच गौरवच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गौरवचा सत्कार करण्यासाठी महामार्ग पोलीस हवालदार उत्तमराव साबळे, स्वच्छता दूत विजय शर्मा, भुसार व्यापारी अनिल अमृतकर, जिभाऊ पैलवान यांनी शाल, श्रीफळ व पेढे देऊन गौरवचा सन्मान केला. गौरवने अति हलाखीच्या परिस्थितीत मिळवलेले हे यश सर्वच तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भैय्या पाटील व त्यांच्या परिवाराचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, सर्वच स्तरातून गौरव पाटील यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत
