अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) –पोलीस प्रशासनाने शहरातील गुन्हेगारीवर कडक कारवाई करत पुन्हा एकदा दहशत माजविणाऱ्या सराईताला गजाआड केले आहे.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्हेगारी रेकॉर्डवरील सराईतांवर सतत बारीक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 13 सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ दादु समाधान सपकाळे (रा. पिंप्राळा) हा पिंप्राळा हुडको परिसरात हातात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असून नागरिक भयभीत होऊन दुकाने बंद करत आहेत.
या माहितीवर तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. पथकाने शोधमोहीम राबविताना सपकाळे हा पिंप्राळा रोडने पळून जात असल्याचे नागरिकांकडून समजले. त्यानंतर खंडेराव नगरकडे जात असताना पथकाने शिताफीने त्याला पकडले. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सपकाळेवर यापूर्वी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोउपनि सचीन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपुत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी व गोविंदा पाटील यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि सचीन रणशेवरे करीत आहेत.
