अधिकार आमचा न्युज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातून एक चमत्कारीक आणि हृदयाला स्पर्शून जाणारी घटना समोर आली आहे. या घटनेने डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडलं आहे. कोरेगाव तालुक्यातील माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया (वय २७) या तरुणीने शुक्रवारी संध्याकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, याआधी पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच आजघडीला काजलच्या आयुष्यात तब्बल सात बाळांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे. त्यामुळे या घटनेची चर्चा साताऱ्यासह राज्यभरात रंगू लागली आहे.
यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया
अवघड अशी ही डिलिव्हरी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या पार पडली. यासाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने अपार मेहनत घेतली. आई आणि सर्व बाळं ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सुरुवातीला थोडीशी धाकधूक होती, मात्र शस्त्रक्रिया यशस्वी पार पडताच रुग्णालयात आनंदसोहळ्याचे वातावरण निर्माण झाले.
गुजरातहून साताऱ्यापर्यंतचा प्रवास
काजलचा पती विकास खाकुर्डिया हा मूळ गुजरातचा रहिवासी असून सध्या सासवड येथे गवंडी म्हणून काम करतो. त्यांच्या घरी आता सात देवदूत अवतरले असून, हे कुटुंब खऱ्या अर्थाने सुख-समृद्धीच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.
गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर?
एका मातेच्या पोटी सात बाळं जन्माला आल्याची घटना दुर्मीळ आहे. त्यामुळेच ही घटना आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर देईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात घडलेली ही घटना इतिहासात नोंद होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
