अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
यावल(प्रतिनिधी)- तालुक्यातील विरावली-दहिगाव रस्त्यावर एका २१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील दोन संशयित आरोपींनी स्वतःहून यावल पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मयत इम्रान युनूस पटेल (वय २१, रा. हनुमंतखेडा, ता. धरणगाव) हा सध्या आपल्या मामाकडे दहिगाव येथे राहत होता. काल रात्री विरावली-दहिगाव रस्त्यावरील खिरवा गावाजवळ त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात इम्रानचा मृत्यू झाला. घटनेनंतर, संशयित ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रवींद्र कोळी (वय १९) यांनी मोटारसायकलवरून थेट यावल पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांचा तपास सुरू
या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
