
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2022 पासून एकल वापर प्लास्टिकवर संपूर्णतः बंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार नगरपरिषदेने एकल वापर प्लास्टिक बंदी अंमलबजावणीसाठी विशेष पथक तयार केले आहे.
शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा. अन्यथा, प्लास्टिक वापरताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल व प्लास्टिक जप्त करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर दि. 20 जून 2025 रोजी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रभावी मोहीम राबविली.
या मोहिमेंतर्गत जुनी नगरपालिका ते शहर पोलीस स्टेशनपर्यंतच्या व्यवसायिक परिसरात जनजागृती करण्यात आली. काही ठिकाणी प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत प्लास्टिक जप्त करण्यात आले. पथक प्रमुख अनिल गाढे (स्वच्छता निरीक्षक), विजय जाधव (स्वच्छता निरीक्षक),राहुल निकम (सॅनिटरी मुकादम), करण चव्हाण (शहर समन्वयक), शशिकांत जाधव (मुकादम),दिनेश गोयर (मुकादम) तसेच सर्व स्वच्छता दूतांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
नगरपरिषदेच्या वतीने अशा प्रकारच्या दैनंदिन कारवाया सुरूच राहणार असून नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून शहर स्वच्छतेस हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.