अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील वॉश आउट मोहीम अंतर्गत कासोदा पोलीस स्टेशनची कारवाई सुरूच असून, जवखेडेसिम (ता. एरंडोल) येथे पत्त्याच्या जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान, गालापूर रस्त्यालगत काटेरी झुडपांच्या आडोशाला काही इसम पैसे टाकून पत्ते खेळत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला असता, १५ जणांना रंगेहात पकडण्यात आले त्यात सोनू धाकू भिल,विरभान श्रावण भिल,राहूल संतोष सोनवणे,प्रवीण वसंत सोनवणे,संतोष माधव सोनवणे,सुनिल दगा ठाकरे,मंगीलाल भाईदास चव्हाण,रतन धाकू भिल,अशोक गोविंदा पाटील,सचिन बापू पवार,कांतीलाल महादू सोनवणे,उत्तम बालाप्पा जेढें,समाधान बापू पाटील,संभाजी महारु पाटील,सुनील सिताराम वाघ (सर्व रा. जवखेडेसिम) यांचा समावेश आहे.
या कारवाईत त्यांच्या ताब्यातून ६,३९० रुपये रोख व १ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकली असा एकूण १,२१,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सपोनि निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नंदलाल परदेशी, निलेश गायकवाड, समाधान तोंडे, प्रदीप पाटील, योगेश पाटील, कुणाल देवरे, लहू हटकर, दिपक देसले यांनी संयुक्तपणे केली. पोलीस कॉन्स्टेबल दिपक देसले यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपींविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने जुगारासारख्या अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईला गावकऱ्यांकडून पाठिंबा मिळत असून अशा मोहिमा भविष्यातही सुरूच राहतील,असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
