अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
पर्यावरणाच्या बाप्पांच्या चरणी १०१ वृक्षांचा महाभोग
संत ज्ञानेश्वर विद्यालयात इको क्लबचा पर्यावरणपूरक उपक्रम
जळगाव(प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा इको क्लबच्या पुढाकाराने “पर्यावरणाच्या बाप्पांच्या चरणी १०१ वृक्षांचा महाभोग” हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतीक सुनील वंजारी व चैताली यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजेने झाली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पासाठी आणलेले १०१ वृक्ष विद्यालय परिसरात रोवून पर्यावरणपूरक संदेश दिला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलन उपक्रमही राबविण्यात आला असून त्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे.
या उपक्रमात संस्थेचे संचालक, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. धार्मिक उत्सवाला पर्यावरण संरक्षणाची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
