अधिकार आमचा न्युज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी हर्षल पाटोळे
पुणे(प्रतिनिधी)-: पुणे जिल्ह्यातील मयत प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबीयांना त्यांच्या हक्काचे आर्थिक लाभ तातडीने देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संतोष सुखदेव वाघमारे हे पंचायत समिती शिरूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे दिनांक ३० मार्च २०२५ रोजी दुर्दैवी निधन झाले. तसेच हौशीराम भीमराव गायकवाड हे पंचायत समिती दौंड, जिल्हा पुणे येथे कार्यरत असून त्यांचा दिनांक १० जून २०२५ रोजी मृत्यू झाला.
या दोन्ही शिक्षकांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी, गट विमा, उपदान (ग्रॅच्युइटी) यांसारख्या आर्थिक लाभांची रक्कम तातडीने मिळणे अपेक्षित होते. मात्र संबंधित कुटुंबीयांना अद्यापही त्यांच्या हक्काची कोणतीही रक्कम देण्यात आलेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याबाबत बोलताना गौतम कांबळे म्हणाले की, आर्थिक मदत न मिळाल्यामुळे संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून आरोग्य व शिक्षणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांनाही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच शिक्षण व अर्थ विभागातील संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावरील लाभ तत्काळ देण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य; शिक्षण आयुक्त, शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे; शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे; शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग; उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन); मुख्य वित्त व लेखा अधिकारी; तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद पुणे यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, राज्य प्रवक्ते व पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण, राज्य सल्लागार दशरथ गावडे, महिला आघाडी नेत्या पौर्णिमा रणपिसे, सुषमा तरटे, सुजाता गायकवाड तसेच दीपक कदम, संतोष ससाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
