अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: स्कुटी व मोबाईल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी यशस्वी कारवाई करत तीन आरोपींना अटक करून सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गु.र.नं. ४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी गणेश तानाजी गवळी यांची दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री स्कुटी व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक शेखर ना. डोमाळे यांच्या नेतृत्वाखाली हेकॉ संदीप पाटील, पोकॉ सागर पाटील व चालक पोकॉ बाबासाहेब पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सायगव्हाण (ता. कन्नड) येथील मनोज छोटू मोरे (१९), आदित्य बाजीराव वाघ (२१) व विनोद रामदास सौदाणे (१९) यांना ताब्यात घेतले. आरोपी क्रमांक १ मनोज मोरे याला श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथून अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींकडून एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये होंडा एव्हीएटर स्कुटी (चेसीस क्र. ME4JC21CEJ8027482), ONE PLUS NORD मोबाईल (IMEI – 865152064259233) तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो शाईन (MH 20 HD 4350) या वाहनाचा समावेश आहे. अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे करण्यात आली असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे.
