अधिकार आमचा न्युज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी लखन शिंदे
दौंड(प्रतिनिधी)- दि. १८ जानेवारी २०२६
दौंड नगरपरिषदेच्या साठवण तलावातून शहरात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सोमवार दि. १९ जानेवारी ते बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ या कालावधीत दौंड शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. विशेष म्हणजे या तीन दिवसांत टँकरद्वारेही पाणीपुरवठा उपलब्ध होणार नसल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.
मुख्य जलवाहिनीवर विविध ठिकाणी झालेल्या लिंकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती. ही नासाडी थांबविणे तसेच जलवाहिनीवरील इतर आवश्यक दुरुस्तीची कामे या कालावधीत केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना काटकसरीच्या पाणी वापरण्याचे आवाहन
मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सर्व दौंडकरांना आवाहन करताना सांगितले की,
“या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर करावा. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपरिषदेला दुरुस्तीचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.”
गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. मात्र प्रारंभी पाणी उशिराने व कमी दाबाने येण्याची शक्यता असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असेही मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
