अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १५ हजार कोटींच्या SAF महाप्रकल्पाचा ऐतिहासिक सामंजस्य करार
चाळीसगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या औद्योगिक व हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण दावोस (स्वित्झर्लंड) येथे साकार झाला आहे. जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum – WEF) 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने चाळीसगाव तालुक्यासाठी तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या Sustainable Aviation Fuel (SAF) महाप्रकल्पाचा सामंजस्य करार केला आहे.
अमेरिका स्थित सॅन फ्रान्सिस्को येथील ACTUAL HQ या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत झालेला हा करार चाळीसगावच्या औद्योगिक इतिहासात मैलाचा दगड ठरणार असून, आमदार मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.
शेती अवशेषांपासून विमानांसाठी हरित इंधन
ऊस पाचट, मका, कापूस काड, सोयाबीन भूसा, तूर काड, बांबू व अन्य कृषी अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा हा प्रकल्प देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाच्या प्रकल्पांपैकी एक असणार आहे. यामुळे चाळीसगावचे नाव थेट जागतिक उद्योग नकाशावर कोरले जाणार आहे.
दावोस येथे सातत्यपूर्ण पाठपुरावा
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दावोस येथे उद्योगजगताशी चर्चा करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या मालाला नवा बाजार मिळावा यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा केला होता.
वर्षभरापूर्वी दिलेले आश्वासन अखेर प्रत्यक्षात उतरवत त्यांनी “शब्द दिला तो पूर्ण केला” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
२००० एकरांवर सस्टेनेबल इंडस्ट्रियल झोन
हा प्रकल्प ACTUAL HQ, Sankla Renewables आणि SCUBE Infra यांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या सुमारे २००० एकरांच्या Sustainable Industrial Zone चा भाग असणार आहे. पुणे आधारित Sankla Group ला औद्योगिक व बांधकाम क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक अनुभव असून स्वच्छ ऊर्जा व ग्रामीण रोजगारावर कंपनीचा विशेष भर आहे.
३ हजार थेट रोजगार, हजारो अप्रत्यक्ष संधी
या महाप्रकल्पातून थेट ३,००० हून अधिक रोजगार निर्माण होणार असून वाहतूक, सेवा क्षेत्र, पुरवठा साखळी व शेतीशी संबंधित हजारो अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
FPO च्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी अवशेष खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळणार आहे. स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जाणार आहेत.
पर्यावरणपूरक आणि जागतिक निकषांनुसार प्रकल्प
संपूर्ण प्रकल्प १०० टक्के नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणार असून,
BESS सह 24×7 वीजपुरवठा
100 टक्के पाणी पुनर्वापर
EV ट्रकद्वारे वाहतूक
ESG निकषांचे संपूर्ण पालन
असे पर्यावरणपूरक उपाय राबवले जाणार आहेत.
पारंपरिक विमान इंधनाच्या तुलनेत SAF मुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ८० टक्क्यांपर्यंत घट होणार आहे. भारताच्या 2070 नेट-झिरो उद्दिष्टांच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
“ही फक्त सुरुवात, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे” – आमदार मंगेश चव्हाण
या करारानंतर प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले,
“आजचा दिवस चाळीसगाव मतदारसंघासाठी ऐतिहासिक आहे. जागतिक उद्योग पटलावर चाळीसगावचे नाव आले, याचा अभिमान आहे. उद्योग, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होतो. ही फक्त सुरुवात असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.”
ACTUAL HQ : भारताला SAF चे जागतिक केंद्र बनवण्याचा संकल्प
ACTUAL HQ चे अध्यक्ष डॉ. कार्तिक बालकृष्णन व Strategic Origination विभागाच्या प्रमुख ऑरोरा चिस्टे यांनी सांगितले की,
“भारताला SAF उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याचा आमचा संकल्प असून चाळीसगावचा हा प्रकल्प पूर्णपणे शाश्वत आणि जागतिक दर्जाचा असेल. महाराष्ट्र सरकारचे आम्हाला पूर्ण सहकार्य मिळत आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चाळीसगावसाठी रोजगार, उद्योग, शेतकरी उत्पन्न व पर्यावरण संरक्षण या सर्वच आघाड्यांवर क्रांतिकारी बदल घडवणारा १५ हजार कोटींचा SAF महाप्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.
