अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख
जळगाव (प्रतिनिधी): अपूर्ण माहितीच्या आधारे एकीकडे छोट्या छोट्या कारणांमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या बातम्यांनी पोलिसांवर टीकेची झोड उठत असताना, दुसरीकडे कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी आपल्या कार्यातून पोलीस दलाचा सन्मान उंचावत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांपैकी रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय एकनाथ शेलार यांना २०२६ सालचे मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार यांनी पोलीस दलात ३५ वर्षांची प्रदीर्घ व निष्कलंक सेवा बजावली असून, त्यांच्या कारकिर्दीत शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा हे गुण कायम जपले आहेत. त्यांच्या सेवाकाळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आजवर २४२ बक्षिसांनी गौरविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात त्यांना एकही शिक्षा, दंड अथवा ताकीद देण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर ३५ वर्षांच्या सेवेत ते एकदाही आजारी रजेवर (सिक लीव्ह) गेलेले नाहीत, ही बाब त्यांच्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेसह कामावरील निष्ठा अधोरेखित करते.
शिस्तप्रिय व प्रामाणिक सेवेची दखल घेत भारत सरकारने प्रजासत्ताक दिन २०२६ च्या पूर्वसंध्येला त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या सन्मानामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकारी, सहकारी व नागरिकांकडून संजय शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टीकेच्या सावटात असलेल्या पोलीस यंत्रणेसाठी संजय शेलार यांचा हा गौरव कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आदर्श ठरत असून, पोलीस दलातील सकारात्मक कार्यालाही योग्य दाद मिळत असल्याचा संदेश यातून मिळत आहे.
